अमरावती-बडनेरा शहरात कृत्रिम पाणीटंचाईवर आमदार रवी राणा आक्रमक

अमरावती: अमरावती व बडनेरा शहरातील पाणीटंचाईवरून आज राजकीय वातावरण तापलं! मुबलक पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी तडफडावं लागतंय, असा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर केला आहे. पाणीचं नियोजन नीट केलं जात नसेल, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असा स्पष्ट इशारा त्यांनी बैठकीत दिला.
अमरावती शहरात दिवसाआड तर बडनेरा शहरात तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. काही भागांत तर आठ आठ दिवसांपासून पाणीच मिळत नाही.
या पार्श्वभूमीवर आज आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. आमदार राणा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही नियोजनाच्या अभावामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी चोरी करणाऱ्यांवर आणि नियोजन योग्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
त्याचबरोबर पाणी सोडण्याचं टाईमटेबल निश्चित करा, अन्यथा कारवाई होईल, असा इशाराही दिला. रवी राणा यांनी सांगितलं की, नागरिकांचे हाल थांबले पाहिजेत, अन्यथा या विषयावर मोठं आंदोलन उभारलं जाईल.
मुबलक पाणीसाठा असूनही पाणीटंचाईचं संकट ही नियोजनाचीच चूक आहे का? रवी राणा यांच्या इशाऱ्यांनंतर आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग काही पावलं उचलतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.