प्रहार पक्षाचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन!

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोगस व खोट्या आणेवारीच्या प्रकरणावर प्रहार जनशक्ती पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झालेला दिसतोय. लेखी आश्वासनानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ, आज प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मुक्काम आंदोलन सुरू केलं आहे.
“तहसीलदार व कृषी विभाग कारवाई करतात, मग जिल्हा परिषदच गप्प का?”
प्रहार पक्षाने फेब्रुवारी महिन्यात 19 ते 22 तारखेदरम्यान आमरण उपोषण केलं होतं. या वेळी तहसीलदार व कृषी विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, मात्र जिल्हा परिषदेने तब्बल दोन महिने उलटूनही एकही जबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाई केलेली नाही, हेच मुख्य कारण आंदोलनामागे असल्याचं प्रहार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
प्रहार पक्षाचे नेते म्हणाले की, “सरळ लेखी आश्वासन असूनही जर कारवाई होत नसेल, तर आम्ही रस्त्यावर उतरणारच. हे आंदोलन म्हणजे जनतेच्या फसवणुकीविरुद्धचा लढा आहे.”
आंदोलनकर्त्यांनी कारवाई होईपर्यंत जिल्हा परिषद कार्यालय न सोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेच्या गप्प बसण्याने प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.