खरंच सोन्याचा रेट 1 लाखावरुन 55 हजार रुपयांवर येणार? सोनं 40 टक्क्यांनी स्वस्त होणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला पत्रकार परिषद घेत रेसिप्रोकल टॅरिफ चीन आणि भारतासह विविध देशांवर लादत असल्याचे जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेचे दूरगामी परिणाम दिसू लागलेत. जर्मनीने आता अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या तिजोरीत ठेवलेले आपले 1200 टन सोने परत मागण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या सोन्याची किंमत 120 अब्ज डॉलर एवढी आहे. सोन्याची दर लवकरच 1 लाखांवर पोहचणार आहेत अशी चर्चा रंगली असतनाच सोनं 40 टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. सोन्याचा रेट 1 लाखावरुन 55 हजार रुपयांवर येणार असल्याचा दावा मार्केट एक्सपर्ट करत आहेत.
देशाच्या वायदा बाजारात आणि दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 91,400 रुपयांच्या पुढे गेले आहे. दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतींनी 94 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. दोन्ही ठिकाणी सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर आहेत. दुसरीकडे सोन्याचे दर 40 टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याच्या चर्चेने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.
सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर जाणार नाहीत. उलट सोन्याचे दर 55 हजार रुपयांपर्यंत घसरू शकतात. सोन्याच्या किमती 40 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. चालू वर्षात सोन्याच्या किमतीत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिकन विश्लेषकाने सोन्याच्या दरात तीव्र घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेतील मॉर्निंगस्टारच्या विश्लेषकांनी पुढील काही वर्षांत सोन्याच्या दरात 38 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 90 हजार रुपयांच्या पुढे आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर 3100 डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आर्थिक अनिश्चितता, महागाईची चिंता आणि भू-राजकीय तणाव यामुळे सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या व्यापारी वादांमध्ये, गुंतवणूकदारांनी सुरक्षित आश्रयस्थानांच्या मालमत्तेकडे वळल्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
जगभरात सोन्याचे उत्पादन वाढले आहे. सोन्याचा जागतिक साठा 9 टक्क्यांनी वाढला आहे. सोन्याचा पुरवठा देखील वाढला आहे. सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 71 टक्के केंद्रीय बँका त्यांच्या सोन्याच्या साठवणुकीत कपात करण्याची किंवा ती टिकवून ठेवण्याची योजना आखत आहेत. भविष्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता.