सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांची गरज – पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी
सामाजिक कार्यक्रमांमुळे समता, बंधुत्वाचा समाजामध्ये संदेश पोहचतो. समाजामध्ये शांतता, सलोखा राखला जावा, यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत, असे आवाहन अमरावती शहराचे पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने दि. 8 ते 14 एप्रिल या कालावधीत समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटनीय भाषण करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वैशाली गुडधे, व्याख्याते प्राचार्य डॉ. सुभाष गवई, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.
समता सप्ताहाचे उद्घाटन झाल्याची घोषणा करुन पोलीस आयुक्त म्हणाले, अमरावती जिल्ह्राला मोठी परंपरा लाभली आहे. विद्याथ्र्यांचा सहभाग सुध्दा अतिशय महत्वाचा असून तेच उद्याचे नागरिक आहेत. विद्याथ्र्यांनी सुध्दा समूह चर्चा केली पाहिजे. ग्रंथालयामध्ये बसून जो अभ्यास होतो, तो इतरत्र होत नाही, असे सांगून त्यांनी समता सप्ताहाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय व आर्थिक लोकशाही नाही – डॉ. सुभाष गवई
भारतात संविधान लागू झाल्यापासून राजकीय लोकशाही अस्तित्वात आली. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य संविधानाने प्रत्येक भारतीयांना दिले. राजकीय, सामाजिक व आर्थिक लोकशाही तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा सामाजिक लोकशाही येईल आणि लोकशाही टिकविण्याची आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अधिसभा सदस्य तथा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी केले. समता सप्ताह उद्घाटन कार्यक्रमामध्ये ‘संविधान निर्माता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे एकही क्षेत्र नाही, ज्याला त्यांचा स्पर्श झाला नाही. संविधान देशवासियांची आचारसंहिता व्हावी अशी त्यांची संकल्पना होती. लोकशाही अधिक मजबुत, सुदृढ करण्यासाठी विरोधी पक्ष प्रभावी असावा अशी धारणा होती. मूलभूत हक्काची सनद म्हणून जगात भारतीय संविधानाची ओळख आहे व लोकशाही टिकविण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांचीच आहे, असेही ते म्हणाले.
स्थिती बदलली, परंतु संघर्ष कायम आहे-कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, समाजाभिमुख, विद्यार्थीभिमुख कार्यक्रम विद्यापीठात होत आहेत. संत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूल्यांची सांगड घालून विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. विद्यापीठ परिसरात संविधान शिल्प उभारुन संत गाडगे बाबांची दशसूत्री आणि संविधानाची उद्देशिका परिसराला भेट देणारे सर्वच वाचतात, यामुळे मोठा संदेश समाजामध्ये पोहचतो आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर स्थिती बदललेली असली, तरी संघर्ष मात्र आपला कायम आहे. समाज व राष्ट्राप्रती आपली जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल, असे सांगून त्यांनी समता सप्ताहाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
विद्यापीठ गीताने सुरू झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, संत गाडगे बाबांंच्या प्रतिमेचे पूजन, मेणबत्ती प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. संतोष बनसोड यांनी, संचालन डॉ. अभिजित इंगळे, तर आभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक डॉ. रत्नशील खोब्राागडे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.
समता सप्ताहनिमित्त 18 तास अभ्यासाला सुरूवात
समता सप्ताहनिमित्ताने विद्यापीठ परिसरातीलच ज्ञानस्त्रोत केंद्र (ग्रंथालय) येथे 18 तास अभ्यासाला सुरुवात झाली. मोठ¬ा संख्येने विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत.