Thane News: जोरदार आवाज अन् इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये १० वर्षांच्या मुलीची बॉडी, ठाणे हादरलं

Thane 10 Year Old Girl Found Dead: ठाण्यातील एका इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये १० वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. ही मुलगी त्या इमारतीत राहणारी नव्हती. ती इथे कशी पोहोचली, तिच्यासोबत नेमकं काय घडलं, याचा तपास पोलीस करत आहेत.
ठाणे: ठाण्याच्या एका १० मजली इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये १० वर्षीय मुलीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ माजली आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सोमवारी रात्री ११.४८ वाजता मुंब्रा परिसरातील सम्राट नगर येथील श्रद्धा प्रति भवनात घडलेल्या या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, ही मुलगी या इमारतीत राहणारी नव्हती. ती या इमारतीमधून जाणाऱ्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये संशयास्पदरित्या पडली. ही मुलगी या परिसरात कशी आली याचा तपास सुरू आहे.
अर्धनग्न अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह
मुलगी अर्धनग्न अवस्थेत होती. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी परिसरातील नागरिकांचीही गर्दी होऊ लागली होती. हा अपघात होता की कोणीतरी ही घटना घडवून आणली, याबाबत काही कळू शकले नाही. याशिवाय मुलीसोबत काही चुकीचं घडलं आहे का याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत. मृत मुलगी ही ठाण्याच्या ठाकूर पाडा परिसरातील राहणारी असल्याची माहिती आहे.
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या इरफानने सांगितलं की, पाणी येत नव्हतं, मग अचानक काहीतरी खाली पडलं आणि जोरदार आवाज आला. कदाचित पाण्याचा पाईप फुटला असावा, असं वाटलं. मी खिडकी उघडून पाहिलं तर तिथे एका ९ ते १० वर्षांच्या मुलीचा मृतदेह पडलेला होता.
मुंब्रा पोलीस ठाणे, अग्निशमन दल, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि खासगी रुग्णवाहिका यासह आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. शाफ्टच्या अरुंद संरचनेमुळे बचाव कार्य आव्हानात्मक असूनही अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुलीचा बाहेर काढले. यानंतर तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ही मुलगी धोकादायक शाफ्टपर्यंत कशी पोहोचली आणि इमारतीच्या सुरक्षेमध्ये काही हलगर्जीपणा किंवा त्रुटी होती का याचा तपास अधिकारी करत आहेत.
बचाव कार्यात सहभागी असलेल्या एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. उंचावरील निवासी इमारतींमधील अशा खुल्या व्हेंटिलेशन डक्टच्या सुरक्षिततेचा गांभीर्याने पुनर्विचार केला पाहिजे, विशेषत: जिथे लहान मुलं आहेत.’ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मुंब्रा येथील ठाकूरपाडा येथील मुंब्रादेवी अपार्टमेंटमधील रहिवासी होती. अधिकाऱ्यांनी पालकांना सतर्क राहण्याचे आणि इमारतींमधील असुरक्षित आणि धोकादायक भागांपासून मुलांना दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.