नांदेड जिल्ह्यात गारपीट व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
नांदेड : नांदेड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्यांनी आणि गारपिटीने शेतकऱ्यांवर संकटांचे ढग गडद केले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, आंबा आणि जवारी यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
केळी पिकांची चाळणी – उत्पादन घटणार निश्चित
गारपीट झाल्यामुळे केळीच्या पानांची चाळणी झाली आहे. त्यामुळे घड परिपक्व होण्यास अडथळा निर्माण झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली फळबाग पूर्णपणे वाया गेल्याचे सांगितले आहे.
जवारी, आंबा आणि घरांनाही जबर फटका
वादळी वाऱ्यामुळे शेतात उभी असलेली जवारी अक्षरशः आडवी झाली आहे. तसेच आंबा बागांतील फळं गळून पडल्याने नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले असून, घराचेही नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांची मागणी – ‘सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे!’
या संकटाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. “तपासण्या आणि अहवालांमध्ये वेळ न घालवता तात्काळ मदत मिळावी,” असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.