नागपूरमध्ये गॅस गोडाऊनवर पोलिसांचा छापा – अवैध गॅस विक्री करणारे ४ आरोपी अटकेत
नागपूर : नागपूर शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गॅस विक्रीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका गॅस गोडाऊनवर छापा टाकून चार आरोपींना रंगेहात पकडले.
गुप्त माहितीवरून डीबी पथकाची कारवाई
पोलिस प्रशासनाला माहिती मिळाली होती की, सदर गोडाऊनमधून होम डिलिव्हरीसाठी पाठवले जाणारे गॅस सिलेंडर अपूर्ण गॅसने भरले जात होते. यानंतर त्याच सिलेंडरमधून गॅस चोरून वेगळ्या सिलेंडरमध्ये भरून अवैधरित्या विक्री केली जात होती.
अटक आरोपी – राजस्थानचे रहिवासी
या कारवाईत मोहन सिंग, जगदीश सिंग, विष्णू कुमार आणि कुलदीप सिंग या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे राजस्थान राज्यातील रहिवासी असून, नोजलचा वापर करून सिलेंडरमधून गॅस काढण्याचा धोकादायक प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले.
३.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून २५ गॅस सिलेंडर आणि एक चारचाकी वाहन जप्त केले. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ३ लाख ७६ हजार ७०० रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
गुन्हा दाखल – पुढील तपास सुरू
आरोपींविरुद्ध संबंधित कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकारामुळे गॅस ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.