हिंगणी ग्रामपंचायतीच्या पाण्याची मोठी चोरी उघडकीस!
हिंगणी : हिंगणी गावात गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेली पाण्याची मोठी चोरी अखेर उघडकीस आली आहे. गोपाल दातकर नावाच्या व्यक्तीने स्वतःला ‘पाणीदार’ म्हणवून गावातील सरकारी पाणीपुरवठ्याचा लाखो रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 2010 पासून गोपाल दातकर यांनी गावातील सरकारी पाण्याच्या पाइपलाइनवर बेकायदेशीर जोडणी करून पाणी चोरले. लोखंडी पाइपच्या माध्यमातून त्यांनी थेट आपल्या घरात आणि शेततळ्यात पाणी पुरवठा केला होता. या पाण्याचा उपयोग त्यांनी गुलाबबाग, घरबांधणी आणि शेतीसाठी केला.
8 एप्रिल 2025 रोजी महाजल प्राधिकरणाचे अधिकारी, हिंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पोलिसांच्या सहाय्याने ही बेकायदेशीर पाइपलाइन तोडण्यात आली. गोपाल दातकर यांनी कारवाईला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांच्या संरक्षणामुळे ही कारवाई यशस्वी ठरली.
तपासातून असे समोर आले आहे की, गोपाल दातकर यांनी अनेक ठिकाणी अवैध पाइपलाइन जोडल्या होत्या. मुख्य 300 मिमी लोखंडी लाइनवर 80 मिमी बॉल व्हॉल्वद्वारे पाणी चोरले जात होते. आतापर्यंतच्या पुराव्यांनुसार, त्यांनी 4 लाख 96 हजार रुपयांचे पाणी चोरले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचे फोटो, नकाशे आणि शेततळ्यातील पाण्याचे पुरावे ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असून, याबाबतची अधिकृत तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आली आहे. पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या गावकऱ्यांमध्ये संताप वाढत असून, प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“एकाबाजूला पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे काही मंडळी स्वतःला ‘पाणीदार’ म्हणवून लाखो रुपयांचे पाणी चोरत आहेत. या घटनेतून प्रशासनाने धडा घेऊन कठोर पावले उचलण्याची गरज आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.