अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत २० हजार गव्हाच्या पोत्यांची आवक
अमरावती : गुरुवारी अमरावतीच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाच्या तब्बल 20 हजार पोत्यांची मोठी आवक झाली. शेतकऱ्यांना यंदा प्रति क्विंटल 2500 ते 3000 रुपये असा भाव मिळाला. एकेकाळी या बाजार समितीत रात्रभर शेतकऱ्यांचे काटे लागायचे. थकवा, अंधार आणि गैरसोयींमधून शेतकऱ्यांना आपला माल मोजून घ्यावा लागायचा. काही वेळा तर व्यापारी रात्रीच्या उशिराचा फायदा घेऊन सौदे कमी दरात करायचे. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे.
सभापती प्रतिभा ठाकरे आणि संचालक मंडळाने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सर्व काटे पूर्ण होतात आणि शेतकऱ्यांना रोख रक्कम तात्काळ हाती मिळते. हा निर्णय शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मैलाचा दगड ठरला आहे.
या बदलामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचत असून, त्यांना योग्य भाव मिळण्याची हमी मिळाली आहे. मात्र, यासोबत काही प्रश्नही उपस्थित होतात – ही सुधारित पद्धत यापूर्वी का लागू झाली नाही? रात्रभर शेतकऱ्यांना अडकवणारे कोण होते? काट्यांच्या प्रक्रियेत सावकारी आणि दलालांचे जाळे किती काळ पसरलेले होते?
हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असला तरी, भूतकाळातील गैरप्रकारांची चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या नव्या व्यवस्थेमुळे त्यांचा विश्वास बाजार समितीवर पुन्हा प्रस्थापित झाला आहे.