बॅग लिफ्टिंगचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात!

अमरावती : प्रिया टॉकीज जवळील राजकमल चौकात 27 मार्च रोजी सायंकाळी झालेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणातील मास्टरमाइंड कुणाल राजकुमार बत्रा (वय 22, राहणार दस्तूर नगर) अखेर अमरावती शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. या घटनेत मोबाइल संचालक आनंदानी यांच्या कर्मचाऱ्याकडून व्यापाऱ्यांकडून जमा केलेली 2 लाख 75 हजार 320 रुपयांची रक्कम भरगच्च गर्दीत हिसकावून आरोपी पसार झाले होते.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या शहर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने सुरुवातीला एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून इतर आरोपींची माहिती समोर आली. त्यानंतर पथकाने मास्टरमाइंड कुणाल बत्राला ताब्यात घेतले. कुणालला मोबाइल संचालक आनंदानी व्यापाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी कर्मचारी पाठवतो, याची पूर्ण माहिती होती. सूत्रांनुसार, कुणाल हा सिटीलॅन्ड येथे कामाला होता आणि तिथेच काम करणाऱ्या इतर साथीदारांसोबत त्याने या गुन्ह्याचा कट रचला होता.
या प्रकरणात कुणालचे साथीदार कबीर नगर येथील साकिब शहा तोफीक शहा (वय 23) आणि अझद खा नूर खा (वय 19) यांनाही 8 एप्रिल रोजी पथकाने ताब्यात घेतले. गेल्या 15 दिवसांपासून कुणाल आणि त्याच्या साथीदारांनी या गुन्ह्याचा प्लॅन आखला होता. कुणालने स्वतः या बॅग लिफ्टिंगची टिप दिली होती. घटनेच्या दिवशी दुपारी 2 वाजेपासून आरोपींनी कर्मचाऱ्यावर पाळत ठेवली होती. राजकमल चौकापासून कर्मचाऱ्यांची रेकी करत त्यांनी संधी साधून ही रक्कम हिसकावली.
कुणालचा प्लॅन होता की, एक मोठा कंड करून तो आरामात आयुष्य जगेल. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचा हा प्लॅन फसला. आता प्रश्न उपस्थित होतो की, ही रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी होती? मोबाइल वसुलीची की आणखी काही? याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.