LIVE STREAM

AmravatiLatest News

शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भौतिक व शैक्षणिक साधनसामुग्री पुरवा – शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर

अमरावती : गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मुलभूत अधिकार आहे. त्यानुषंगाने शासनाकडून निपूण महाराष्ट्र अभियान, आदर्श शाळा, सी.एम.श्री शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान असे विविध उपक्रम व विद्यार्थी लाभाच्या योजना राबविल्या जातात. राज्यातील प्रत्येक शाळा ही आदर्श शाळा बनण्यासाठी त्याठिकाणी खासगी शाळांप्रमाणे भौतिक व शैक्षणिक साधनसामुग्री पुरवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना आज येथे दिले.

येथील महानगरपालिकाच्या सभागृहात आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री भोयर यांनी अमरावती विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, शिक्षण उपसंचालक निलिमा टाके तसेच पाचही जिल्ह्यांचे प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य यावेळी उपस्थित होते.

श्री भोयर म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमाची अमरावती विभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयी व सुविधा, गुंतवणूक प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या सात कलमी कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याबाबत राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला. प्रत्येक तालुक्यात किमान दोन आदर्श शाळा निर्मितीसाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार यांना शाळा दत्तक घेण्याची मागणी करुन पालकमंत्री आदर्श शाळा, आमदार आदर्श शाळा निर्मितीसाठी सहाय्यता करण्याबाबत विनंती करण्यात यावी. विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी प्रत्येक शाळेचे दर्जेदार बांधकाम, त्याठिकाणी शुध्द पिण्याचे पाणी व मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह यासारख्या प्राथमिक सुविधांची तजवीज करावी, असेही त्यांनी सांगितले.

विभागात 72 आदर्श शाळांकरिता 60 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून नियोजन आराखड्यानुसार सर्व शाळांचे बांधकाम पूर्ण करण्यात यावीत. प्रत्येक शाळेत भौतिक सोयी-सुविधा आणि शैक्षणिक साधनसामुग्री उपलब्ध करुन द्याव्यात. शाळांमध्ये डीजीटल क्लासरुम, पायाभूत सुविधांची उभारणी, ग्रंथालय, खेळाचे मैदान, शुध्द पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी प्राथमिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. आदर्श शाळांच्या निर्मितीसाठी समन्वय व देखभाल संबंधी डायटचे प्राचार्यांनी जबाबदारी पार पाडावी. विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात ज्ञानार्जन करता यावे, यासाठी विद्यार्थीहिताच्या दृष्टीने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद उपलब्ध करुन दिल्या जाईल, असेही राज्यमंत्री भोयर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी निपूण महाराष्ट्र अभियान, आदर्श शाळा, सीएमश्री शाळा, नवीन राष्ट्रीय धोरण, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान, विविध गुणवत्तापूर्ण व नाविण्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी लाभाच्या योजना व अंमलबजावणी यासंदर्भात संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून राज्यमंत्र्यांना माहिती दिली.

महापालिका प्रशासनाच्या अखत्यारित येत असलेल्या शाळाबाबत व शैक्षणिक सोयी सुविधाबाबत आयुक्त श्री. कलंत्रे यांनी राज्यमंत्री श्री. भोयर यांना सविस्तर माहिती दिली. महापालिकांच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थी संख्या 6 हजार 500 वरुन 9 हजार 500 वाढ झाल्यानिमित्त राज्यमंत्र्यांच्या हस्ते आयुक्त श्री. कलंत्रे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!