नांदेड हादरलं! कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, शेतात बाभळीच्या झाडाला…

नांदेड : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धर्माबाद तालुक्यातल्या पाटोदा (थडी) येथील अल्पभूधारक शेतकरी हरिदास विश्वंभर बोंबले (वय 40) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. हरिदास बोंबले यांनी धर्माबाद तालुक्यातील संताजी आंबेकर यांच्या शेतातील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शेतात सकाळी स्थानिकांनी त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
शेतीसाठी घेतलेले 1 लाख 83 हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने बँकेची थकबाकीची नोटीस आली. येत्या सात दिवसात व्याजासकट कर्ज फेडा अन्यथा कायदेशीर कारवाई करून कर्ज वसूल करू अशी नोटीस आल्याने एवढी रक्कम कशी फेडायची याच्या मानसिक ताणावाखाली येऊन शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचचलं आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचं पाऊल
हरिदास हे अल्पभूधारक शेतकरी होते. आपल्या शेतावर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना मात्र, सततची नापिकी, वाढती उत्पादनखर्च, बाजारातील कमी दर आणि कर्जाचा डोंगर यामुळे ते मानसिक तणावात होते. शेवटी या तणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता बोंबले (वय 38), मुलगा युवराज बोंबले (वय 20) आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर सारा गाव हळहळला असून स्थानिक लोकांनी शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी, कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, त्यांच्या मुलाचं शिक्षण आणि घराचा आधार टिकावा यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही होत आहे.