अपघातग्रस्ताची 1.5 लाखांची बॅग पोलिसांनी केली सुपूर्द, गणेशपेठ पोलीस ठाण्याची माणुसकी
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा प्रामाणिकता आणि माणुसकीचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. सीए रोडवरील दर्शन टॉवर परिसरात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ४२ वर्षीय विजय कुडमेथे यांची रोख रक्कम असलेली बॅग पोलिसांनी सुरक्षित ठेवून ती त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली.
विजय कुडमेथे (राहणार: चीज भवन, नागपूर) यांचा अपघात झाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी त्यांची बॅग ताब्यात घेतली होती. या बॅगमध्ये तब्बल १ लाख ५० हजार ६५० रुपये इतकी रोख रक्कम होती. पोलिसांनी बॅग सुरक्षित ठेवत विजय यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नांनंतर त्यांच्या पत्नी अर्चना विजय कुडमेथे (वय ३६) यांच्याशी संपर्क साधण्यात यश आलं.
आज, पंचासमक्ष गणेशपेठ पोलिसांनी ही बॅग आणि त्यातील संपूर्ण रक्कम अर्चना यांच्याकडे सुपूर्द केली. या प्रामाणिक आणि माणुसकीने भरलेल्या कृतीमुळे गणेशपेठ पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. नागपूर पोलिसांनी दाखवलेल्या या कर्तव्यनिष्ठेमुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि आदर वाढला आहे.