‘काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय…’, अजित पवारांच्या वक्तव्याची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा!

Ajit Pawar On Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीच्याआधी राष्ट्रवादीत फूट पडली. अनेक आमदार, खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले. यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहिले. विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळाले आणि अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला गेला. यानंतर काका-पुतण्या यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. दरम्यान अजित पवारांनी बारामतीला असताना काकांना उद्देशून एक विधान केलंय. या विधानावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
बारामतीती एका कार्यक्रमात रस्त्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना अजित पवारांनी एक मिश्किल टिप्पणी केलीय. ‘रस्त्याच्या कामांबाबत काकाला विश्वासात घ्या. कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे चालत नाही’, असं अजित पवारांनी म्हटलंय.
अजितदादांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. यानंतर बोलताना अजितदादांनी आपण काका कुतवलांबाबत बोलल्याचं म्हटलंय.नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल ‘दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत’, असंही अजित पवार मिश्किलपणे म्हणालेत.