भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा भव्य रॅलीचे आयोजन
अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या निर्देशानुसार दि ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन, अमरावतीद्वारा संचालित आश्रित अंध कर्मशाळेत सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त १३ एप्रिल रोजी राहुल नगर, बिच्छू टेकडी प्रभागात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅलीला कर्मशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक श्री. पंकज मुदगल यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी बोधात्मक फलक हातात धरून घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला. महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी रॅलीचे आकर्षण ठरले. रॅली आश्रित अंध कर्मशाळेपासून सुरू होऊन राहुल नगर, बिच्छू टेकडी प्रभागात फिरवण्यात आली.
राहुल नगर येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन आणि हारार्पण पंकज मुदगल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक पठण केले. रॅलीत कर्मशाळेचे सर्व विद्यार्थी, कर्मचारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सामाजिक समता सप्ताहांत ८ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी पंकज मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास घायवट, विनोद सदाशिव, किशोर भड, मोसेस लव्हाळे, धनराज कावनपुरे, अश्विनी सरोदे, जगन राठोड, श्रीकृष्ण राऊत, चंद्रशेखर कळंबे, अरविंद मानकर, ऋषिकेश बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाने सामाजिक समता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.