यवतमाळ: घाटंजी येथे आयपीएल सट्टा रॅकेटवर धाड; चौघांना अटक, 1.71 लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ: यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने घाटंजी येथील कान्होबा टेकडी परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्टा रॅकेटवर धडक कारवाई करत चौघांना अटक केली आहे. या कारवाईत 1 लाख 71 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घाटंजी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एलसीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, कान्होबा टेकडी परिसरातील खुल्या जागेत हैद्राबाद विरुद्ध पंजाब या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनच्या सहाय्याने सट्टा खेळला जात आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने छापा टाकला. यावेळी प्रतीक द्रोणा, शुभम खांडरे, कार्तिक धांदे आणि प्रचमेश घुघाने (सर्व रा. घाटंजी) या चौघांना सट्टा खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपींकडून चार मोबाईल फोन, दोन दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 71 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चौघांनी लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार बाढवे, उपनिरीक्षक धनराज हाके आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
एलसीबीच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत
यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी एलसीबी पथक सातत्याने कारवाई करत आहे. या सट्टा रॅकेटवरील कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशा गुन्ह्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.