महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लि. नागपूर येथे विद्यार्थ्यांची औद्योगिक सहल

विदर्भ यूथ वेलफेयर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित बॅ.रामराव देशमुख कला, इंदिराजी कापडिया वाणिज्य, न्या.कृष्णराव देशमुख विज्ञान महाविद्यालय बडनेरा तर्फे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेची बी.कॉम भाग – ३ च्या विद्यार्थ्यांची आद्योगिक सहल शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी लि नागपूर येथील ऑटोमोबाईल उत्पादन संयंत्राला भेट दिली. या भेटी मागचा उद्देश विद्यार्थ्यांना वाहन निर्मिती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा होता. भेटीची सुरुवात कंपनी व्यवस्थापनाच्या स्वागताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे श्री.संजय अग्रवाल यांनी विद्यार्थ्याना कंपनी बद्दल माहिती दिली त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना महिंद्रा कंपनीचा वारसा, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि शाश्वत उत्पादन पद्धती याबद्दल माहिती देण्यात आली.
२०१० पासून महिंद्रा जगातील पहिल्या क्रमांकाचे ट्रॅक्टर विकणारी कंपनी बनली जी आजही कायम त्या मानांकनावर कायम आहे तसेच एक ट्रॅक्टर ३ मिनिटमध्ये कसा उत्पादित होतो तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर ४० देशांमध्ये निर्यात केले जातात अश्या विविध पैलूनवर मार्गदर्शन केले. दौऱ्यात, विद्यार्थ्यांनी वेल्डिंग, पेंटिंग, इंजिन असेंब्ली आणि अंतिम तपासणी यासारख्या वाहन निर्मितीच्या महत्त्वाच्या टप्प्यांचे निरीक्षण केले. यावेळी अधिकाऱ्यांनी स्वयंचलित यंत्रणा आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) कसे कार्य करते आणि उत्पादन प्रक्रियेत गुणवत्ता आणि कार्यक्षमता कशी वाढवते हे समजावून सांगितले. भेटीतील एक आकर्षण म्हणजे उद्योग तज्ञ आणि अभियंत्यांशी संवाद साधण्याची संधी. विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक वाहने (EVs), शाश्वत उत्पादन तंत्र आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील करिअर संधींवर चर्चा केली. ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरली, ज्यातून त्यांना ऑटोमोबाईल उद्योग आणि त्यातील प्रगत तंत्रज्ञान यांचा थेट अनुभव मिळाला. अशा औद्योगिक दौर्यांमुळे सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यामधील अंतर कमी होते, तसेच भविष्यातील अभियंते आणि व्यावसायिकांना उद्योगासाठी तयार होण्यास मदत होते. या औद्योगिक सहलीमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे ५० विदयार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
या सहलीच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.आर.डी.देशमुख या औद्योगिक सहलीचे समन्वयक म्हणून डॉ.नकुल देशमुख, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे जनरल मॅनेजर श्री.नरेंद्र सातफळे, डी.जी.एम.अभिजीत कळंबे, माजी जनरल मॅनेजर डॉ.गजानन मोहोड, डॉ.मंजू अहिर, प्रा.नागेश काळमेघ, प्रा.मोना यादगिरे, श्री. सागर आगरकर यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद बघून आयोजन समितीने भविष्यात सुद्धा अश्या अनेक औद्योगिक सहलीचे आयोजन करण्यात येइल याची हमी दिली. अतिशय सुंदर प्रकारे या औद्योगिक सहलीचा उद्देश पूर्ण झाला.