भीषण! एसटी- टेम्पोची जबर धडक; बुलढाण्यात चौघांचा जागीच मृत्यू, 15 जखमी

Buldhana Accident : भीषण अपघाताचा थरार. राष्ट्रीय महामार्ग 53 वर नेमकं काय घडलं? वाहनांचा चक्काचूर, रस्त्यावर फक्त काचा अन् विटा…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मंगळवारी भीषण अपघात झाला. विटा वाहून नेणारा मेटाडोर आणि मध्यप्रदेश परिवहनची एसटी यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडून आला, जिथं या भीषण धडकेमध्ये विटा वाहून नेणाऱ्या मेटाडोर मधील तीन जण जागीच ठार झाले, तर एसटी बसमधील एक जण ठार झाला असून एसटीतील दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात तसेच खामगावच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. इथं पोलीस आणि स्थानिकांच्या सहाय्याने मदत कार्य या ठिकाणी सुरू करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर हा भीषण अपघात झाला.
दोन्ही वाहनं वेगात आली आणि…
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दोन्ही वाहनं इतक्या वेगात होती, की त्यांच्यात अतिशय भीषण धडक झाली आणि बससह वाहनाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या धडकेनंतर वाहनांच्या काचा फुटून रस्त्यावर विखुलल्या आणि विटासुद्धा रस्त्यावर पसरल्या. दरम्यान या अपघातात जखमींची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतांची ओळख पटवण्यासाठीचं काम सुरू केलं.