यवतमाळमध्ये भीषण अपघात: डाळ मिलमधील स्टोरेज कोसळून तिघा मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
यवतमाळ : यवतमाळ शहरालगतच्या लोहारा MIDC परिसरातील मनोरमा जैन डाळ मिलमध्ये सोमवारी (१४ एप्रिल) सायंकाळी एक भीषण अपघात घडला. डाळ साठवण्यासाठी उभारलेले स्टील स्टोरेज अचानक कोसळल्याने तिघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना मजूर आपले नियमित काम करत असताना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टोरेजचा एक भाग कोसळून पाच मजूर त्याखाली दबले गेले. यात भावेश कडवे (रा. वर्धा), मुकेश सुरेश काजले (रा. खंडवा, मध्यप्रदेश) आणि सुरेश काजले (रा. रामपूर, खंडवा, मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप आणि करणसिंग धुर्वे (दोघे रा. रामपूर, खंडवा, मध्यप्रदेश) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चौकशीला सुरुवात
पोलिसांनी स्टोरेज कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्टोरेजच्या बांधकामातील त्रुटी किंवा जास्त वजनामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती चौकशीनंतरच समोर येईल.
कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेने डाळ मिलमधील कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. औद्योगिक क्षेत्रात अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य देखरेख आणि सुरक्षित बांधकामाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.