नागपूरमध्ये १३ लाखांचं सोनं चोरी! आरोपी महिला अटकेत
नागपूर : हिंगणघाट येथील देवगीरकर ज्वेलर्सच्या मालकाकडून २२४ ग्रॅम सोन्याची चोरी करणाऱ्या अज्ञात महिलेला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीतील १३,५४,०५६ रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले असून, ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
२८ मार्च २०२५ रोजी, देवगीरकर ज्वेलर्सचे मालक यांनी नागपूरच्या बडकस चौकातील रमेश ज्वेलर्सकडून २२४ ग्रॅम सोने खरेदी केले. खरेदीनंतर ते बस स्थानकाकडे निघाले असताना एका अज्ञात महिलेसोबत रिक्षा शेअर केली. निलेश ट्रॅव्हल्ससमोर उतरल्यानंतर खासगी बसमध्ये चढताना त्यांना लक्षात आले की, सोन्याने भरलेली त्यांची पर्स चोरीला गेली आहे. याप्रकरणी त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३०३ (२) VNS अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार पवन मालखेडे यांनी सतत ४-५ दिवस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि बाजारात खरेदीदार बनून संशयित महिलेचा शोध घेतला. अखेरीस, चीटनीस पार्क चौकात संशयित महिला दिसली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विश्वासात विचारपूस केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून १३,५४,०५६ रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.
ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, उपायुक्त महक स्वामी, सहायक आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात मल्हारी डोईफोडे, समीर शेख, पवन मालखेडे, वैभव यादव, दलीत लोखंडे, सुमेध नितनवरे, सागर धवन, मेषा चरपे आणि आरती राठोड यांचा समावेश होता.
पोलिसांचे कौतुक: या यशस्वी कारवाईमुळे नागपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनीही अशा घटनांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.