“मुर्तीजापुरात चोरीविरोधात नागरिक रस्त्यावर! | गावकऱ्यांचा रात्रपाळीचा धडाका

अकोला (मुर्तीजापूर): अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यात मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, आता नागरिकांनी स्वतः पुढे येत रात्रपाळी सुरू केली आहे. या उपक्रमामुळे पोलीस प्रशासनालाही मोठा आधार मिळत असून, नागरिक आणि पोलिसांच्या एकत्र प्रयत्नांमुळे चोरट्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये स्थानिकांनी संघटितपणे मोहिम हाती घेत रात्रभर गस्त घालण्यास सुरूवात केली आहे. याच दरम्यान काही गावकऱ्यांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून त्यापैकी काहींना थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं. काही चोरटे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी अडवलेल्या चोरट्यांकडून शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला असून, त्याच्याशी संबंधित अधिक माहिती व संभाव्य गुन्हे शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.