महामानव आंबेडकरांच्या जयंतीला सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर पुसदमध्ये स्तुत्य उपक्रम

पुसद, यवतमाळ– स्वच्छता आणि मूलभूत नागरी सेवेत अहोरात्र कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या आरोग्यदृष्ट्या सन्मानार्थ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचभौतिक आयुर्वेद चिकित्सालय यांच्या वतीने पुसद शहरात एक महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं.
या उपक्रमात शहरातील एकूण १०८ कर्मचारी सहभागी झाले, ज्यामध्ये ४० पुरुष आणि ६८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांनी शहरातील स्वच्छता, मलनिस्सारण सेवा, बागा, रस्ते, कुपनलिका आणि पाणिपुरवठा यांसारख्या क्षेत्रांत योगदान दिलं आहे.
शिबिरात नाडी परीक्षण, उदर तपासणी आणि विविध आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. अनेक कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेत समाधान व्यक्त केलं.
नगरपरिषद पुसदचे कर्मचारी संजय पवार यांनी भावना व्यक्त करत सांगितलं, “अशा उपक्रमांमुळे आम्हालाही वाटतं की आपलं योगदान लक्षात घेतलं जातं.”
या आरोग्य शिबिराबाबत वैद्य अमोल खांदवे यांनी सांगितलं,
“स्वच्छतेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पंचभौतिक चिकित्सालय अशाच आरोग्यवर्धक आणि जनजागृतीपर उपक्रमांची मालिका सुरु ठेवणार आहे.”