अकोल्यात पाणी प्रश्नावर संतापाची आग! शिवसेनेचा जलप्रदाय विभागात धडक मोर्चा

अकोला – अकोला शहराला भेडसावत असलेल्या गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नावर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. शहरातील मलकापूर परिसरात दिवसेंदिवस वाढणारी टंचाई आणि नागरिकांना मिळणाऱ्या दूषित पाण्यामुळे असंतोष शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आज माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली घागर आंदोलन छेडण्यात आलं.
मोर्चादरम्यान महापालिकेच्या जलप्रदाय विभागात शिवसैनिकांनी थेट धडक दिली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली आणि जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला. यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.
महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार अकोला शहरात आता पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र मलकापूर, जुना शहर परिसर, आणि इतर भागांमध्ये अनेक दिवसांपासून पाणीच येत नाही, आणि जिथे पाणी मिळतंय, तिथं ते पूर्णपणे दूषित स्वरूपात आहे.
या परिस्थितीविरोधात रोज पाणी मिळावं, ही मागणी आंदोलनकर्त्यांनी ठामपणे मांडली. शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर समस्या तात्काळ सोडवली नाही, तर आंदोलनाचा भडका संपूर्ण शहरभर उसळेल.
नगरवासीयांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरीत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वत्र होत आहे.