अमरावतीत पाईपलाईन फुटली, २२ – २३ एप्रिल पाणीपुरवठा बंद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं आवाहन

अमरावती : माहुली परिसरात सिंभोरा धरणातून अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी 1500 मिलीमीटर व्यासाची जूनी पाइपलाइन अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहे. परिणामी, 22 आणि 23 एप्रिल या दोन दिवसांसाठी अमरावती आणि बडनेरा शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
सध्या कडक उन्हाळ्यामुळे अनेक भागांत आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अशात पाइपलाइन फुटल्याने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. पाइपलाइनच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा खंडित होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन MJP चे उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी केले आहे.
“नागरिकांनी 22 आणि 23 एप्रिल या दोन दिवसांसाठी मुबलक पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा,” अशी विनंती लेवरकर यांनी केली आहे. MJP विभाग दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांना सावधगिरीचे आवाहन
पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा आणि साठवणुकीची व्यवस्था करावी. तसेच, पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याऐवजी आधीच नियोजन करावे, असे MJP ने सुचवले आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहितीही विभागाने दिली आहे.