माँ जिजाऊ रथयात्रेचे यश सुलभा संजय खोडके मित्र परिवाराच्या वतीने भव्य स्वागत
अमरावती : राजामाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली. आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले. माँ जिजाऊ समता आणि न्यायाच्या पुरस्कर्त्या होत्या. शिवारायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच माँ जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. माँ जिजाऊं त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या.या शब्दांत यश सुलभा संजय खोडके यांनी शब्दसुमनांनी माँ जिजाऊंच्या रथ यात्रेचे स्वागत केले.
दिनांक 18 मार्च ( वेरूळ )ते 1 मे 2025 (लाल महाल, पुणे ) यानुसार माँ जिजाऊ रथयात्रा मार्गक्रमण सुरु आहे.मराठा सेवा संघ व कक्षाद्वारा दिनांक 18 मार्च 2025 पासून विविध जिल्ह्यातून निघालेली माँ जिजाऊंच्या रथयात्रेचे गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी अमरावती शहरात आगमन झाले. यावेळी कर्मयोगी संत गाडगेबाबा मंदिर परिसर समीप यश संजय खोडके यांनी व सहकारी मंडळीनी व युवक बांधवानी माँ जिजाऊंच्या रथ यात्रेचे स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडविले व त्यांना स्वराज्य स्थापन करण्यासह या सुराज्याचा विस्तार करण्यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले अशा राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या प्रतिमेस यश खोडके यांनी वंदन -पूजन -नमन करीत याप्रसंगी माल्यार्पण केले.
एकूण 45 दिवसांची असलेली या रथयात्रेचा उद्देश हा मराठा समाजात जागृती करणे समाज संघटनेची घडी नीट बसविणे, महिला -युवक -शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणे, आपल्या संविधानिक जवाबदाऱ्या समजून घेत, सध्या समाजा समाजामध्ये निर्माण केले जात असलेले संशयाचे वातावरण दूर करून सर्व समाजात सामाजिक एकता व सदभावना निर्माण करत दंगलमुक्त महाराष्ट्र घडविणे असा आहे. माँ जिजाऊंच्या रथ यात्रेचे स्वागत करताना सर्व उपस्थितानी ” रक्ता रक्तात भिनलाय काय – जय जिजाऊ जय शिवराय “, “तुमचं आमचं नातं काय – जय जिजाऊ जय शिवराय ” असा जयघोष करीत यावेळी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा उद्योजक कक्ष आदिसहित सर्व कक्षाचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.