अमरावतीत कुष्ठरोग प्रतिबंध आणि निर्मूलनावर दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
अमरावती : कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटल आणि सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत १६ व १७ एप्रिल रोजी कोठारा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘कुष्ठरोगासंबंधी अपंगत्व प्रतिबंध’ या विषयावर झालेल्या या प्रशिक्षणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणात कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद चव्हाण, आयएलईपी एनएलईपी कन्सल्टंट सुरेश धोंडगे आणि अलर्ट इंडियाचे श्री. अन्सारी यांनी कुष्ठरोगाचे विविध पैलू, रोगनिदान आणि प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष रुग्ण तपासणी आणि रोगनिदानाच्या प्रक्रियांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले.
जिल्हास्तरीय अवैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. अलर्ट इंडियाचे फिजिओथेरपिस्ट श्री. अन्सारी यांनी कुष्ठरोगाकडे ‘लेप्रसी माइंडसेट’ ठेवून समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, “लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे कुष्ठरोगामुळे होणारे अपंगत्व टाळता येऊ शकते.”
सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार यांनी डॉ. मिलिंद चव्हाण, पंचानन गोरैन, मिलिंद चांदेकर आणि त्यांच्या चमूचे यशस्वी आयोजनाबद्दल आभार मानले. या प्रशिक्षणामुळे कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.