अमरावती: खडकी आणि झाडगावात जलक्रांती; नयना चिंचे आणि रुपेश रेंगेंचा कुलगुरूंनी केला गौरव

अमरावती : दुष्काळ व पाणीटंचाईवर कळंब तालुक्यातील खडकी येथील नयना चिंचे व राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील रुपेश रेंगे या युवकांनी संघटन करुन विधायक कार्यातून अफलातून मात केली. त्यांच्या या प्रयत्नामुळे गावात आता जलक्रांती झाली. याचीच दखल घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुुरु डॉ.मिलिंद बारहाते यांनी थेट खडकी गावात या दोनही युवक-युवतीचा सत्कार केला. यावेळी अमरावती विद्यापीठाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून नयना चिंचे व रुपेश रेंगे यांनी स्वत:ला झोकुन देत कार्य केले. यासाठी त्यांनी गावातील विद्यार्थी, युवक व नागरिकांना एकत्र केले. सर्वांमध्ये एकजूट व विश्वास निर्माण केला. आणि सर्व एकाध्येयाने झपाटल्यागत कामाला लागले. गावातील पाणी गावातच कसे राहील यासाठी प्रयत्न केले. प्रामाणिक प्रयत्नामुळे गावातील व परिसरातील दुष्काळ पळऊन लावण्यात त्यांना यश मिळाले. त्यांच्या या कार्याची दखल थेट कुलगुरु डॉ मिलींद बारहाते यांनी घेतली. त्यांनी गावात येत या दोघांचाही सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. थेट कुलगुरु गावात येऊन एखाद्या विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याची ही पहिलीच घटना आहे.
यावेळी कुलगुरू यांनी आपल्या भाषणातून, या दोघांचेही कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. स्वप्रेरणेने त्यांनी हे कार्य केलेले आहे. त्यामुळे स्वप्रेरणा अतिशय महत्वाची आहे. अभिनेते नाही तर हेच खरे आपले आदर्श आहे. त्यामुळेच त्यांचा थेट गावात येऊन विद्यापीठातर्फे सत्कार केला जात आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अविनाश असनारे, तसेच महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. नयना चिंचे व रुपेश रेंगे यांनी मनोगतातून आपल्या गावाकरिता पाण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाला विद्यार्थी विकास संचालक डॉ.राजीव बोरकर, विद्यापीठ प्रशासन विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखडे, कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक रमेश जाधव, प्राचार्य डॉ.पवन मांडवकर, सरपंच जयश्री घोसले, उपसरपंच सुनिता कासार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.निलेश कडू यांनी केले. संचालन प्रा. स्वप्नील गोरे तर आभार यवतमाळ जिल्हा समन्वयक डॉ.निलीमा दवणे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ.वीरा मांडवकर, प्रा.प्रशांत जवादे, कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल दौलतकर, प्रा. सुधीर त्रिकांडे, प्रा. सुशील बत्तलवार, डॉ.दत्तात्रय चव्हाण, माजी सरपंच संजय मोरे, अशोक उमरतकर, प्रा.सरोज लखविदे, डॉ.कैलास नेमाडे, डॉ.वेद पत्की, डॉ.एम.पी.राखुुंडे आदींसह गावकरी तसेच इंदिरा गांधी महाविद्यालय राळेगाव, कला व वाणिज्य महाविद्यालय राळेगाव, इंदिरा महाविद्यालय कळंब, भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगाव, नानीबाई घारपडकर महाविद्यालय बाभुळगाव, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.