मेळघाटात आशा वर्करची गर्भवती महिलेवर अमानुष मारहाण
मेळघाट : मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील डोमा गावात एक धक्कादायक आणि निंदनीय घटना घडली आहे. एका आशा वर्करने तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेवर लाकडी काठीने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. घर बांधकामाच्या किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेत गर्भवती महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या असून, तिचे दातही पडले आहेत. इतकेच नव्हे, या आशा वर्करने महिलेच्या पतीलाही मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना घडल्यानंतर पीडित गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर चूरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखलदरा पोलिसांना तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आशा वर्कर आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मेळघाटातील आदिवासी भागात गर्भवती महिलांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या आशा वर्करकडूनच अशा प्रकारचे हिंसक कृत्य घडणे अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेमुळे स्थानिक आदिवासी समाजात, विशेषत: महिलांमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्भवती महिलांच्या काळजीसाठी नियुक्त व्यक्तीकडूनच हिंसाचार होत असेल, तर या भागातील महिलांनी कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेने स्थानिक समाजात संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. यासोबतच, आशा वर्कर्सच्या नियुक्ती आणि त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही समोर येत आहे.