तेल्हारा बंदला संमिश्र प्रतिसाद, हिंदू समाजाचा खोट्या गुन्ह्यांविरोधात निषेध
अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथे १६ एप्रिल २०२५ रोजी दहीगाव फाट्यावरील कमानवरील निळ्या झेंड्यांचा कथित अवमान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला होता. या प्रकरणी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये दहीगाव येथील काही युवकांविरुद्ध तक्रार दाखल झाली होती. मात्र, ही तक्रार चुकीच्या पद्धतीने आणि सखोल चौकशीविना दाखल करण्यात आल्याचा आरोप हिंदू समाज आणि स्थानिकांनी केला आहे.
या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ समस्त हिंदू संघटना, हिंदू समाज आणि व्यापारी-व्यवसायिक वर्ग यांनी १८ एप्रिल रोजी तेल्हारा शहरात स्वयंस्फूर्तीने बंदचे आवाहन केले होते. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तेल्हारा शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद राहिली, तर काही भागांमध्ये व्यवहार सुरू होते. स्थानिकांनी तेल्हारा पोलिसांवर घाईगडबडीने आणि पक्षपातीपणे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सदर खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
हिंदू समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून खोटे गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी केली आहे. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, आणि शहरात शांतता कायम होती. पोलिस प्रशासनाने या प्रकरणी निष्पक्ष तपास करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.