अमरावतीत काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
अमरावती : केंद्र सरकारने नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मालमत्तेवर कारवाई करत ती जप्त केल्याच्या निषेधार्थ आज अमरावतीत शहर व जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेत्यांविरोधात केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत खटले दाखल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार आणि प्रदेश सचिव आसिफ तवक्कल यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी ही कारवाई लोकशाही विरोधात असल्याचा ठपका ठेवला.
या निदर्शनात माजी महापौर अशोक डोंगरे, मुन्ना राठोड, हरिभाऊ मोहोड, पंकज मेश्राम, अब्दुल रऊफ, अभिनंदन पेंढारी, सोमेश्वर आप्पा मुंजाळे, डॉ. मतीन अहमद, हुसैन खान यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काँग्रेसचा आरोप
- नॅशनल हेराल्ड प्रकरणात सूडभावनेने मालमत्ता जप्त
- विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सत्तेचा गैरवापर
- ही कारवाई लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी