परतवाडा-धारणी महामार्गावर पिकअप वाहन पलटी, आमदार केवलराम काळे यांनी दिला अपघातग्रस्तांना मदतीचा हात
परतवाडा : परतवाडा-धारणी महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेत आणखी एक घटना घडली. काल, मेळघाटचे आमदार केवलराम काळे धारणीहून परतवाड्याकडे परत येत असताना, घटांगणा गावाजवळ एक पिकअप वाहन पलटी झाल्याचा अपघात घडला. या अपघातात वाहनचालक राहुल शेवाळे (वय ३०, रा. कांडली) गाडीमध्ये अडकले होते.
आमदार केवलराम काळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि राहुल शेवाळे यांना गाडीमधून काढून आपल्या वाहनातून परतवाडा येथील रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने, त्यांच्या या तत्परतेमुळे चालकाचे प्राण वाचले. यावेळी आमदार काळे यांच्यासोबत उत्तम मोडक, आकाश खैरकर, कुणाल काळे, बिपीन गुरव आणि रोहित धानोरकर उपस्थित होते.
महामार्गावरील अपघातांची मालिका चिंताजनक:
परतवाडा-धारणी महामार्गावर वारंवार होणारे अपघात स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. रस्त्याची दुरवस्था, गतिरोधकांचा अभाव आणि वाहनचालकांचा बेजबाबदारपणा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात स्थानिकांनी प्रशासनाकडे रस्ता दुरुस्ती आणि सुरक्षाव्यवस्थेची मागणी केली आहे.