अंबाझरी पोलिसांचा लोकांप्रती अमानुष वागणूक आणि अन्याय !
नागपूर : नागपूरच्या प्रभाग क्रमांक १३ मधील अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या मनमानी कारवायांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. एका दलित व्यापाऱ्यावर अन्याय, लग्नात बेवजह मारहाण आणि हत्या, अवैध धंदे तसेच वसुलीच्या साम्राज्याचे गंभीर आरोप नागरिकांनी केले आहेत. या घटनांमुळे पोलिसांविरोधात रोष वाढत असून, लोकशाही मूल्यांना काळिमा फासणाऱ्या या कृतींविरोधात तातडीने कारवाईची मागणी होत आहे.
दलित व्यापाऱ्यावर अन्याय:
प्रभाग क्रमांक १३ मध्ये, भाजपचे स्थानिक कार्यकर्ते योगेश पाचपोर आणि वॉर्ड अध्यक्ष विजय चौरे यांच्या उपस्थितीत, अंबाझरी पोलिसांनी एका दलित व्यापाऱ्याच्या स्टॉलवर कोणतीही नोटीस न देता कारवाई केली. उष्णतेमुळे दुपारी बंद असलेल्या स्टॉलबाहेर ठेवलेलं किरकोळ सामान पोलिसांनी उचलून नेलं, ज्यामुळे व्यापाऱ्याच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम झाला. विशेष म्हणजे, हा व्यापारी शासकीय योजनेअंतर्गत स्टॉल चालवतो आणि त्याच्याकडे सर्व वैध कागदपत्रं, तसेच NOC आहे. तरीही पोलिसांनी कोणताही संवाद न साधता दादागिरी केल्याचा आरोप आहे.
हिलटॉप परिसरात मारहाण:
याच परिसरातील हिलटॉप येथे हट्टेवार कुटुंबाच्या लग्नात, API पठाण यांनी एका नागरिकाला बेवजह मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिकांचा दावा आहे की, API पठाण मद्यधुंद अवस्थेत होते. या घटनेत कोणतीही पूर्वसूचना किंवा संवाद न साधता थेट हिंसक कारवाई करण्यात आली. तुरकर कुटुंबाशी संबंधित आणखी एका घटनेने पोलिसांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्थानिक नागरिकांनी अंबाझरी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीत हत्या, अवैध धंदे आणि वसुलीचं साम्राज्य खुलेआम सुरू असल्याचा दावा आहे. “पोलिसांचं लक्ष नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा वसुलीवर आहे,” असं एका नागरिकाने सांगितलं. प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर मिळालेलं उत्तर, “जोपर्यंत मारत नाही, तोपर्यंत हे सुधारणार नाहीत,” हा लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार आहे.
या घटनांमुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पोलिसांच्या मनमानी, जातीय अन्याय आणि दडपशाहीविरोधात नागरिकांनी आवाज उठवला आहे. “ही दादागिरी त्वरित थांबवली नाही, तर जनतेचा रोष उफाळून येईल,” असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, दलित व्यापाऱ्याला न्याय मिळावा, यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्तेही प्रयत्नशील आहेत.
या प्रकरणी अंबाझरी पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. वाढता जनक्षोभ पाहता प्रशासनाला लवकरच यावर स्पष्टीकरण द्यावे लागेल. नागरिकांना महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरील तक्रार पोर्टलद्वारे तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.