पालकमंत्र्यांचे सतत जिल्ह्या दौरे मात्र प्रश्न जैसे थे

अमरावती : शनिवारी अमरावतीत आयोजित शिक्षक मेळाव्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील आरोग्य, स्वच्छता आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं वक्तव्य केलं. मात्र जिल्ह्याचा वास्तव चित्र काही वेगळंच सांगत आहे. मेळघाटातील जलजीवन योजना फोल ठरत आहे – उन्हाळ्याच्या तडाख्यात भीषण पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना मैलोनमैल पाणी आणावं लागतंय.
आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय – काही दिवसांपूर्वी मेळघाटात गरोदर महिलेला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाने प्रशासनाची झोप उडवली होती, आणि आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. निराधार वृद्ध महिलांना गेल्या ४ महिन्यांपासून अनुदान मिळालेलं नाही. यामुळे त्या महिलांना जगण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. शहरातील स्वच्छता मोहीम देखील ठप्प झाली आहे. कचऱ्याचे ढिग, रस्त्यावरील दुर्गंधी आणि साफसफाई अभावामुळे नागरिक त्रस्त झालेत. एकीकडे पालकमंत्री आदेश देत आहेत, तर दुसरीकडे विभाग त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरही प्रशासनाकडून फक्त खुलासा दिला जातो, पण ठोस पावलं मात्र घेतली जात नाहीत. यामुळे अमरावतीच्या नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. प्रश्न असा आहे की, ‘पालकमंत्री भाषणातूनच समजूत काढणार की कृती देखील करणार?