मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांचा बंटाढार!
धारणी : धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरातील प्रत्येक गावातील पाणी पुरवठा योजना या वर्षी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. विशेषत: राणी गावासह संपूर्ण मेळघाटातील ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत राबवण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. प्रधानमंत्री जल जीवन मिशन आणि मुख्यमंत्री जलसुरक्षा योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजनांचा बोजवारा संबंधित ठेकेदार आणि गावातील काही भ्रष्ट व्यक्तींमुळे झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, धारणी तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी करताना ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले असून, भ्रष्टाचारामुळे योजनेचा उद्देशच हरवला आहे. यामुळे मेळघाटातील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या समस्येकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिक तरुण आणि ईवा पिढीने या प्रश्नावर आवाज उठवला असून, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे. जोपर्यंत या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मेळघाटातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार नाही, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे. आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद आणि प्रशासनाच्या कारवाईकडे लागले आहे.