डोंगरदऱ्यांत अडकलेलं मेळघाट: राणीगावचा रस्ता की मृत्यूचा सापळा, प्रशासनाच दुर्लक्ष
धारणी तालुक्यातील राणीगाव : जे नाव उच्चारलं तरी डोळ्यांसमोर उभं राहतं ते एक खडतर, धोकादायक प्रवासाचं चित्र. डोंगर-घाटांतून जाणारा रस्ता म्हणजे जीवावर उदार होऊन घ्यावं लागणारं धाडस. दोन-दोन फुटांचे खड्डे, दरवेळी ढासळणारी रस्त्याची बाजू, आणि पावसाळ्यात अचानक कोसळणाऱ्या दरडी – हीच इथली रोजची वाट.
एका बाजूला समृद्धी महामार्गाचा प्रचंड गाजावाजा, तर दुसरीकडे मेळघाटातील रस्ते अजूनही ‘राम भरोसे’.
राज्य व केंद्र सरकारकडून मेळघाट विकासासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी जाहीर होतो, पण जमिनीवर चित्र मात्र भीषण. निधी खर्च झाल्याच्या फाईली मात्र फुंकून निघाल्या, आणि वास्तवात उरले फक्त खड्डे आणि अपघातांची भीती.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, EE आणि JE, हे प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी दिसण्याऐवजी राजकीय कार्यक्रमांत झळकतात. तर स्थानिक आदिवासी बांधव रोजचा प्रवास करताना जीव मुठीत धरतात.
“आम्ही शाळेत मुलांना पाठवतो, पण रस्ता बघून दरवेळी वाटतं की हे परत घरी येतील की नाही,” असं एका ग्रामस्थाने सांगितलं.
माजी खासदार नवनीत राणा यांनी स्वतःला ‘मेळघाटची मुलगी’ असं संबोधलं होतं, मात्र त्यांनी दिलेली आश्वासने आता हवेत विरून गेल्यासारखी वाटतात. ना विद्यमान खासदार, ना आमदार, ना जिल्हा प्रशासन – कुणालाही या रस्त्यांची आठवण राहत नाही.