उपोषणाचं यश: शासनाची मान्यता, अकोटमध्ये रविराज मोरे यांचं जल्लोषात स्वागत
अकोट : १४ एप्रिलपासून मुंबईतील आजाद मैदानात सुरू झालेलं पत्रकार रविराज मोरे यांचं आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरलं आहे. माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पत्रकारांना शस्त्र परवाना, आणि अकोट सारख्या संवेदनशील शहरात अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केलं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने या उपोषणाची सुरुवात झाली होती. या लढ्यात पवन बेलसरे, अकबर खान, दिपक दाभाडे, रामदास बोंडे, अभिजीत सोलंके, कैलास अकर्ते यांच्यासह अनेक पत्रकारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद
उपोषणाच्या दबावामुळे राज्य सरकारने मोरे यांच्या सर्व मागण्या मान्य करत तात्काळ अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. यामध्ये अकोल्यातील बोगस शिक्षक प्रकरणाची चौकशी, शिक्षण उपसंचालकांची नियुक्ती, आणि शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्यावर चौकशीचा समावेश आहे.
अकोटमध्ये जल्लोषात स्वागत
आज रविराज मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अकोट रेल्वे स्थानकावर आगमन होताच शेकडो कार्यकर्ते, पत्रकार बांधव, आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी भव्य स्वागत केले. स्टेशनबाहेर फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ, आणि जयघोषांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण काकड, विठ्ठल कुलट, परवेज खान, सुभाष तेलगोटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
“लढा दिल्लीपर्यंत नेणार” – रविराज मोरे
स्वागत समारंभात बोलताना रविराज मोरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे, मार्गदर्शकांचे आणि समाजातील सर्व घटकांचे आभार मानले. त्यांनी ठामपणे सांगितले की, “हा लढा थांबणार नाही, आम्ही याच जोमात पुढे दिल्लीच्या रामलीला मैदानापर्यंत ही लढाई नेणार आहोत.”