विदर्भावर सूर्य कोपला, पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा; कोकणात व उर्वरित राज्यात कसे असेल हवामान?

Maharashtra Weather Today: राज्यभरातील तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट आलीये. चंद्रपूर तर जगात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. अजून एप्रिल महिना सुरू असतानाच तापमानात इतकी वाढ होत आहे. अद्याप मे महिना उजाडला नाहीये. त्याआधीच उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण झाले आहेत. आज तापमान कसे असेल, जाणून घेऊया.
आज विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. त्यामुळं येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण कायम असून उन्हाचा ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर छत्तीसगडपासून तेलंगणा, रायलसीमा, तामिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळं उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. तर, तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. विदर्भ देशात उष्ण ठरत असून देशातील पहिल्या दहा उष्ण शहरांत विदर्भातील पाच शहरांचा समावेश आहे.
चंद्रपूर सगळ्यात उष्ण शहर
चंद्रपूर देशातच नव्हे, तर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. सोमवारी शहराचा पारा 45.6 अंशावर पोहचला. रविवारीही ते देशात पहिलेच होते. आता पुढील 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत चार शहरे विदर्भातीलच आहेत. चंद्रपूरनंतर जगात तिसऱ्या क्रमांकावर जिल्ह्यातीलच ब्रम्हपुरी शहर असून, जेथे सोमवारचे तापमान 45 अंश होते. अमरावती पाचव्या क्रमांकावर आहे. येथे सोमवारचा पारा 44.6 अंशावर गेला आहे. यादीत 44.1 अंशासह अकोला जिल्हा 12 व्या क्रमांकावर आहे.
जगातील सर्वात उष्ण 15 पैकी 11 शहरे भारतातील
जगभरातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये 11 शहरे एकट्या भारतातील आहेत. विदर्भातील 4 शहरांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावरील झारसुगुडा येथे 45.4 अंश तापमान नोंदविण्यात आले. सहाव्या क्रमांकावर सिधी (44.6), सातवे राजनांदगाव (४४.५), 9 व्या क्रमांकावर प्रयागराज व धूपुर (44.3),11 वे खजुराहो (44.2), 14 वे आदिलाबाद (43.8) आणि 15 व्या क्रमांकावर रायपूर (43.7) यांचा समावेश