Supriya Sule : पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही, त्यांचा निर्णय मान्य असेल : सुप्रिया सुळे

पुणे : राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे फुटलेली राष्ट्रवादी एकत्र येणार का यावरही चर्चा केली जात आहे. काही ना काही निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे सातत्याने भेटताना दिसत आहे. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रितिक्रिया दिली आहे. पवार साहेब आणि अजितदादा एकत्र आले तर आपली हरकत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार आणि अजित पवार हे जे काही निर्णय घेतील तो मान्य असेल अशी सूचक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितच आहोत अशी प्रतिक्रया सुप्रिया सुळे यांनी दिली. कौटुंबिक संबंध हे आमच्या फार जुने आहेत. आमचे राजकीय मतभेद जरी झाले असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते एनडी पाटील यांचा दाखला दिला. त्या म्हणाल्या की, “एनडी पाटील आणि शरद पवारांचे टोकाचे मतभेद होते. तरीही आम्ही, आमच्या आत्यांमध्ये कधीही कटुता आली नाही. आता दादा जर सॉफ्ट होत असतील तर त्यात गैर काय?”
शरद पवारांनी या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा टीका केली आहे. पण हे दोन्ही नेते एकमेकांना आदरपूर्ण भेटतात असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजितदादांचा प्रस्ताव आला तर काय?
उद्या जर अजित पवारांचा एकत्र येण्याचा प्रस्ताव आला तर काय करणार या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. आता पाऊस पडला तर काय होईल याचं उत्तर मी देऊ शकत नाही. मी जे काही बोलते ते अतिशय जबाबदारीने बोलते. आतापर्यंत एकत्रिकरणाचा कोणताही प्रस्ताव माझ्यापर्यंत आला नाही.”
काका-पुतण्याच्या भेटी
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिले काही महिने अजित पवार हे त्यांचे काका शरद पवारांना जाहीर व्यासपीठावर भेटणं टाळत असल्याचं चित्र होतं. अनेकदा एका कार्यक्रमात असूनही दोन्ही नेते एकमेकांकडं पाहायचेही नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांत या दोन नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्याचं चित्र दिसत आहे.
कधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीत, कधी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत तर कधी कौटुंबिक कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र दिसले. रविवारी पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्युटमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या बैठकांना एकत्र हजेरी लावली. त्यामुळं ठाकरे बंधुंच्या जुळवाजुळवीसोबत पवार कुटुंबाच्या जुळवाजुळवीची चर्चाही सुरु झाली आहे.