Hingoli Crime : हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली; हिंगोलीत दुसऱ्या दिवशी मंदिरात चोरी

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. हिंगोली शहरातील प्राचीन खटकाळी हनुमान मंदिरातील दानपेटी फोडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली- वसमत राज्य मार्गावर असलेल्या हनुमान मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सलग मंदिरात चोरी होण्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटींवर लक्ष केले आहे. दोन दिवसापूर्वी हिंगोली शहराच्या जवळ असलेले प्राचीन खटकाळी हनुमान मंदिर चोरट्यांनी लक्ष करत या मंदिरातील हजारो रुपये असलेली दानपेटी पळवली होती. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद देखील झाले होते. मात्र पोलीस चोरीचा तपास करत असताना आज सकाळी पुन्हा एकदा चोरट्यांनी हिंगोली वसमत राज्य मार्गावरील चौकीचा मारुती असलेल्या मंदिरात पुन्हा एकदा दानपेटी फोडली आहे.
दोन चोरट्यानी लांबविली दानपेटी
दुचाकीवर आलेले दोन्ही चोरट्यानी आधी मंदिराच्या परिसरात रेकी केली. यानंतर या चोरट्यांनी मंदिराच्या आतमधील लोखंडी चॅनल गेट लोखंडी रॉडने वाकवत आतमध्ये प्रवेश करत चोरी केली आहे. धक्कादायक म्हणजे चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या एका चार चाकी वाहनाने या चोट्यांचा पाठलाग देखील केला. मात्र चोरटे पसार झाले आहेत.