शहरात सोमवारीमहानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम
मोहीम सुरूच राहणार, जप्त केलेले साहित्य परत मिळणार नाही : उपायुक्त डॉ.मेघना वासनकर
अमरावती : अमरावती महानगरपालिकेने सोमवारी ट्रक व जेसीपीद्वारे इतवारा बाजार, झेंडा चौक, चित्रा चौक, नगर वाचनालय, बापट चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. सदर परिसरात रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असल्याचेही उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी सांगितले.
इतवारा बाजार, झेंडा चौक, चित्रा चौक, नगर वाचनालय, बापट चौक परिसरसह संपूर्ण शहरात महानगरपालिकेने अतिक्रमणांवर कारवाईचे नियोजन केले आहे. दिवसभरात केलेल्या कारवाईत अनेकांचे साहित्य जप्त करण्यात आले. या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या जास्तीत जास्त विक्रेत्यांचे साहित्य, कपड्याचे गठ्ठे, जाहिरात फलक, दुकानांसमोरील लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. सदर रोडवरील रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हातगाड्यावर कारवाई सुरू होताच विक्रेते गाड्या घेऊन जिथे जागा मिळेल, तेथे पळाले. त्यातील अनेकांच्या गाड्या, साहित्य जप्त करण्यात आले. तसेच रस्त्यावर व्यवसायिक, दुकानदारांनी लोखंडी स्टूल, टेबल व जाळ्या टाकून अतिक्रमण केले होते. त्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. बाजारांमधील हातगाडीधारक, पथविक्रेते यांचे साहित्य, टेबल, ताडपत्री, बांबू, जाहिरात फलक, गाड्या जप्त करण्यात आल्या. तेथे रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिक, विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य, गाड्या जप्त केल्या.
महानगरपालिकेने सुरू केलेली मोहीम थांबणार नसून, सर्व भागात कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यावर कोणीही एकच जागी थांबून किंवा रस्त्याला अडथळा होईल या पद्धतीने व्यवसाय करून अतिक्रमण करू नये, अन्यथा कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत मिळणार नाही, असा इशारा उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी दिला आहे.
सदर कारवाई दरम्यान उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, झोन क्र.५ चे सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे, झोन क्र.२ चे सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, उपअभियंता आशिष अवसरे, विवेक देशमुख, जयंत काळमेघ, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम चावरे, मनपा कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.