अंकुश कडू चे मारेकरी अटकेत नागपूरशहर पोलीससाची यशसवी कारवाई

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या थरारक खून प्रकरणामुळे नागपूर हादरून गेला आहे. प्रॉपर्टी डिलर अंकुश कडू (वय ५४) यांचा काही अज्ञात व्यक्तींनी अमरपाली अपार्टमेंट, म्हाडा चौक, नारी रोड येथे धारदार शस्त्राने खून केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ५ ने हाती घेत अत्यंत गुंतागुंतीचा गुन्हेगारी कट उघडकीस आणला आहे.
घटनेचा तपशील:
संध्याकाळी ५.४५ वाजता घडलेल्या या घटनेनंतर मृतकाचे पुत्र प्रथमेश अंकुश कडू (वय २५) यांनी कपीलनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत वडिलांना तातडीने मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
व्यवहारावरून वाद, आणि नियोजित कट:
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, अंकुश कडू यांचा संगीता गोपिचंद सहारे या महिलेच्या ११ एकर जमिनीच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. संगीता सहारे, तिचा मुलगा आकाश सहारे, व्यावसायिक भागीदार अशोक मिश्रा आणि ड्रायव्हर अश्विन खोळगे यांनी मिळून हा गुन्हेगारी कट रचला होता.
१५ लाख, गाडी आणि कोर्ट खर्चाच्या मोबदल्यात खून:
मुख्य सुत्रधार राहूल वाघ याने चौकशीत कबुली दिली की, त्याला १५ लाख रुपये, एक फोर व्हीलर आणि कोर्ट खर्च देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार त्याने सहायक आरोपी राजेश उर्फ राजा बोकडे, विलास नंदनवार, आकाश सहारे आणि चार विधीसंघर्ष बालकांच्या मदतीने हा खून केला.
पोलिसांची अचूक कारवाई:
गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सर्व आरोपींना ओळखून ताब्यात घेतलं. पोलिसांनी अत्यंत कुशलतेने ही कारवाई करत गुन्ह्याचा छडा लावला. संपूर्ण तपास नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
आरोपींविरोधात पुढील कारवाई सुरू:
सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून प्रकरणाशी संबंधित आणखी आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे.