जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वनविभागाचा हरित उपक्रम
अमरावती : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात आला. वाढत्या तापमानामुळे त्रस्त पृथ्वीला थोडासा श्वास देण्याचा प्रयत्न करत कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याचसोबत पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासाठी सर्व कर्मचाऱ्यांना मातीची जलपात्रं वाटप करण्यात आली.
उपक्रमाचा शुभारंभ मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्या हस्ते झाला. यावेळी विभागीय वनाधिकारी दक्षता किरण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद डंबाले, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, रवी वाठोडकर आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.
उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी Wildlife Awareness Research and Rescue Welfare Society (WAR), अमरावती या संस्थेच्या संकल्पनेतून मातीची जलपात्रं वितरित करण्यात आली. या उपक्रमाने वनविभागाच्या सामाजिक भान आणि निसर्ग संवर्धनातील सक्रियतेचे दर्शन घडवले.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून २२ एप्रिल ते १ मे २०२५ दरम्यान वसुंधरा संवर्धन सप्ताह साजरा केला जाणार आहे. या काळात वृक्षारोपण, जनजागृती मोहीम, शालेय स्पर्धा, आणि पर्यावरण विषयक चर्चासत्रांसह विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांनीही आपल्या परिसरात जलपात्र ठेवून पक्ष्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.