Gold Rate Today: सोन्याचा भाव 3500 रुपयांनी घसरला, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती?

Gold Rate Today: मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती, त्यानंतर आता अमेरिका आणि चीनमधील दीर्घकाळ चाललेल्या टॅरिफ वॉरबाबत दिलासा देणाऱ्या बातमीमुळे सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 1355 रुपयांच्या घसरणीसह 95,985 रुपयांवर व्यवहार करत आहेत. चांदीच्या दरात देखील आज घसरण झाल्याचे चित्र आहे. चांदी आज 95667 वरती आहे, तो 212 रुपयांनी कमी झाला. आता त्याचा परिणाम आज सराफा बाजारातही दिसून येतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांना काढून टाकण्याची धमकी मागे घेतल्याने आणि चीनशी व्यापार करार होण्याची आशा व्यक्त केल्याने आज बुधवारी सोन्याच्या किमती घसरल्या. स्पॉट गोल्ड 0.7% घसरून $3,357.11 प्रति औंस झाले. अमेरिकन सोन्याचे वायदे 1.5% घसरून $3,366.80 वर आले.
दिल्लीत काल (मंगळवारी) सोन्याच्या किमतीत 1800 रुपयांची वाढ झाली आणि त्यांनी प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांची महत्त्वाची पातळी ओलांडली. दरम्यान, अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईच्या काळात मागणी वाढण्याची अपेक्षा असल्याने मौल्यवान धातूला पाठिंबा मिळाला.जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढत आहे, त्यामुळे सोन्यात सतत वाढ होत आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 1355 रुपयांच्या घसरणीसह 95,985 रुपयांवर व्यवहार करताना दिसला.
तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये अमेरिका आणि चायना यांच्या मधे सुरू असलेल्या ट्रेड वॉर मध्ये या दोन्ही देशात काही प्रमाणात तडजोड होण्याची चिन्हे दिसताच सोन्याच्या दरात 3200 रुपयांची घसरण झाली आहे. सोने 99000 हजार रुपयांवरून सोन्याचे दर हे 95800 वर आले आहेत. या दोन्ही देशात तडजोड झालीच तर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरू शकणार असल्याची प्रतिक्रिया सोने व्यावसायिकांनी दिली आहे.
सोन्याचे दर खाली येण्याबाबत अनिश्चितता
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीत अमेरिका मोठ्या संभ्रमात आहे. त्यामुळे सोन्याचे दर खाली येण्याबाबत अनिश्चितता आहे. जोवर अमेरिका व चीनमधील आर्थिक स्थितीचे पुढचे चित्र स्पष्ट होत नाही तोवर दर घटण्याची शक्यता नाही. शॉर्ट टर्म म्हणजे पुढील 3 महिन्यांपर्यंत घसरणीची शक्यता खूपच कमी आहे
आतापर्यंत सोन्याच्या भावात 26 टक्के वाढ
रशिया-युक्रेन युद्धापाठोपाठ इस्रायल-हमास संघर्ष, चीनचा विस्तारवाद, बँकांचे व्याजदर धोरण, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्कवाढीचे बेभरवशी राजकारण यामुळे जागतिक परिस्थिती अत्यंत नाजूक बनत चालली आहे. अस्थिरता वाढल्याने जगभरातील मध्यवर्ती बँकांनीही सोनेखरेदीवर भर दिल्याने सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चालू वर्षात आतापर्यंत सोन्याच्या भावात 26 टक्के वाढ झाली आहे.अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची मागणी आधीपासूनच मजबूत बनली आहे.