पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना अकोल्यात श्रद्धांजली; भाजपकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

अकोला – काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर घटनेचा निषेध करत अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील महाराणा प्रताप उद्यानाच्या समोर आयोजित या श्रद्धांजली सभेत हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी भाजपचे खासदार अनुप धोतरे, तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून आणि दोन मिनिटांचे मौन पाळून हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. “दहशतवाद्यांचा हा भ्याड हल्ला संपूर्ण मानवतेसाठी काळा दिवस आहे. सरकारने कठोर पावले उचलून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित नेत्यांनी दिली.
या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असून, अनेक ठिकाणी नागरिक आपल्या पद्धतीने श्रद्धांजली देत आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा एकदा अस्थिर होत असल्याचे संकेत मिळत आहेत.