श्री शक्ती महाराज यांनी केला आतंकी हल्ल्याचा निषेध

अमरावती – श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानच्या वतीने श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तिजी महाराज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. या अमानुष हल्ल्यात उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा येथील २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा अधिक नागरिक जखमी आहेत.
श्री शक्तिजी महाराज म्हणाले की, “हा हल्ला केवळ निरपराधांवर नव्हे, तर भारताच्या अस्मितेवरच घातलेला घाव आहे. याचा केंद्र सरकारने तातडीने आणि कठोर प्रत्युत्तर द्यावे.”
या पत्रकार परिषदेत त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावरही टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शहरातील ८४ वॉर्डांमध्ये रस्त्यांवर घाण, दुर्गंधी आणि रोगराईचा प्रकोप वाढत आहे. सफाई व्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे. जर पालिकेने लवकरात लवकर कारवाई केली नाही, तर महापालिकेसमोर आमरण उपोषण करणार.”