शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ थेट बांधावरच होणार ‘राजीव गांधी कृषी रत्न’ पुरस्कार वितरण!

अमरावती – राज्यात गेल्या १९ वर्षांपासून सुरू असलेला ‘राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार’ यंदा एका वेगळ्या आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडणार आहे. यंदा शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक आणि ग्रामविकास चळवळीचे मार्गदर्शक प्रकाश साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२१ मे हा राजीव गांधी स्मृती दिन, दरवर्षीप्रमाणे ‘शेतकरी सन्मान सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी अंगोडा गावातून एक उत्कृष्ट बैलजोडी पूजनाच्या माध्यमातून ‘शेतकरी सदभावना पुरस्कार’ देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
प्रकाश साबळे यांनी सांगितले की, “चांदा ते बांधा” अशी संकल्पना राबवत, शेतकऱ्यांच्या निस्वार्थ कार्याला योग्य तो मान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी पुरस्कार वितरणाचा सोहळा प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरच होईल, जेणेकरून खऱ्या अर्थाने हा पुरस्कार मातीशी नाळ जोडणाऱ्या हातांना दिला जाईल.