अमरावतीत यशोदा नगरमध्ये शॉक सर्किटमुळे डीपीला भीषण आग

अमरावती – शहरातील यशोदा नगर परिसरात पेट्रोल पंपाजवळील इलेक्ट्रिक डीपीमध्ये शॉक सर्किटमुळे अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. घटनास्थळी उपस्थित स्थानिक युवकांनी तत्काळ बकेटमध्ये पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली.
या आगीचे ठिपके खाली पडल्याने जवळच असलेल्या रिकाम्या प्लॉटमधील कचऱ्याने देखील पेट घेतला. विशेष म्हणजे, ही आग जवळच असलेल्या पेट्रोल पंपाजवळ भडकल्याने संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता.
अग्निशमन दलाची तात्काळ कारवाई, परंतु…
अग्निशमन दलाच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे आग नियंत्रणात आली, मात्र या घटनेत लक्ष वेधणारी बाब म्हणजे पेट्रोल पंपावर अग्निशमन साहित्य असतानाही त्याचा वापर न झाल्याचं निदर्शनास आलं.
युवकांची तत्परता – एक मोठा धडा
या घटनेत स्थानिक युवकांनी दाखवलेली तत्परता आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी वेळेवर पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आगीचा प्रसार रोखण्यात मोठी मदत झाली.