श्रीनगरमध्ये अकोल्याचे सहा नागरिक अडकले , आमदार साजिद पठाण यांनी घेतली तत्काळ दखल

अकोला : श्रीनगरमधील लंकार रिसॉर्ट, कंटार चौक आणि सदर बाल या परिसरात अकोल्याचे सहा नागरिक अडकले असून, ते सध्या सुरक्षित स्थळी असून अकोल्यात परतण्याची वाट पाहत आहेत. या नागरिकांमध्ये जगदीश हरिराम तोलानी, सुनिता तोलानी, आशु किर्तानी, चाहत आहूजा, नंदिता किर्तानी आणि घेना आहूजा यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर या नागरिकांच्या कुटुंबीयांनी अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. आमदार पठाण यांनी त्वरित परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत श्रीनगर प्रशासनाशी तसेच अकोल्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून संबंधित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हालचाली सुरू केल्या.
केंद्रीय पातळीवरही प्रयत्न
याशिवाय, आमदार पठाण यांनी केंद्रीय मंत्रालयाशीही संवाद साधत या अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत, संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहून आवश्यक ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद
या सहा अडकलेल्या नागरिकांशी आमदार पठाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला. त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेतली आणि त्यांना दिलासा देताना सांगितले की,
“श्रीनगरमध्ये काहीही लागल्यास त्वरित सांगा – पूर्ण मदत केली जाईल. आपण सुरक्षित राहा, प्रशासन आपल्या पाठिशी आहे.”
मानवी संवेदनशीलतेचा आदर्श
ही संपूर्ण घटना एक मानवी संवेदनशीलतेचे आणि लोकप्रतिनिधींच्या तात्काळ प्रतिसादाचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. संकटसमयी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात, हे यातून दिसून आले आहे.