अमरावतीत ‘ग्रीन नेट’ची छत्रछाया: दुपारच्या उष्म्यापासून वाहनचालकांना दिलासा, ट्राफिक सिग्नलही दुपारी बंद

अमरावती : सतत वाढत चाललेल्या तापमानामुळे अमरावतीकरांसाठी उन्हाचा त्रास असह्य झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आणि ट्राफिक विभागाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला असून दुपारी 1 ते 5 या वेळेत शहरातील ट्राफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच महत्त्वाच्या चौकांवर ग्रीन नेट बसवून वाहनचालकांना उन्हापासून संरक्षण दिलं जात आहे.
इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, गाडगे नगर, पंचवटी चौक, शेगाव नाका आणि राजकमल चौक या प्रमुख चौकांवर भव्य ग्रीन नेट लावण्यात आले आहेत. या ग्रीन नेटमुळे आता ट्राफिक सिग्नलवर उभं राहणाऱ्या वाहनचालकांना उन्हाच्या झळा बसणार नाहीत.
दुपारी सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालकांनी स्वतःच्या समजुतीवर आणि शिस्तीने वाहने चालवावीत, असे आवाहन ट्राफिक विभागाकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे एकीकडे उष्णतेपासून दिलासा मिळतोय, तर दुसरीकडे सौंदर्यवृद्धी आणि पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणून त्याची चर्चा होऊ लागली आहे.
शहरातील रिक्षाचालक, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारक सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
शहरवासीयांनी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, इतर शहरांनीही या उपक्रमाची प्रेरणा घेण्याची गरज आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुसंवेदनशील आणि नागरिकाभिमुख प्रशासनाची जाणीव करून देणारा ठरत आहे.