काकडा गावात विषबाधेमुळे १८ पेक्षा अधिक बकऱ्यांचा मृत्यू

अचलपूर : काकडा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतमजुरीवर गुजराण करणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या बकऱ्यांनी धुरावर असलेल्या टाक्यातील साचलेले दूषित पाणी प्यायल्याने त्यांना विषबाधा झाली. या घटनेत १८ पेक्षा जास्त बकऱ्यांचा मृत्यू झाला असून काही बकऱ्यांवर अचलपूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पशु अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
या मृत बकऱ्या म्हणजे बुरडवर चालणाऱ्या एका गरीब शेतमजुराचा संपूर्ण संसार होता. अचानक घडलेल्या या संकटामुळे शेतमजुरावर आत्महत्येची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
काकडा गावच्या सरपंच संगीता अपाले यांनी शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. संपूर्ण गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या विषबाधेला जबाबदार कोण? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तसेच, बकऱ्यांच्या मालकाच्या आर्थिक नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.